पुरुषाचा संसार...

ही कविता पुरुषाच्या न बोलल्या जाणाऱ्या त्यागाची, जबाबदाऱ्यांची आणि दुर्लक्षित भावनांची कथा सांगते.


घराच्या भिंतींवर त्याचं नाव नसतं,
पण त्या भिंती उभ्या ठेवण्यात त्याचा हात असतो.
आई-वडिलांचा आधार, लेकरांचा पिता,
बायकोचं सर्वस्व, आणि मित्रांचा सखा,
पण स्वतःच्या स्वप्नांसाठी त्याच्याकडे मात्र जेमतेम वेळ असतो.

सकाळी कामावर निघताना,
रोजच्या खर्चाचे पैसे ठेवतो,
घरच्या नेक जबाबदाऱ्याचा विचार करत,
स्वतःच्या इच्छांना मागे ढकलतो.
घराच्या छपरासारखा असतो तो,
दाटून आलेल्या संकटांना झेलत राहणारा,
डोळ्यांत असलेल्या पावसाला न दिसू देणारा,
आणि उन्हाळ्यातही सावली देणारा - तो एक पुरुष बाप असतो.

स्वतःच्या स्वप्नांना फक्त स्वप्नच ठेवणारा,
आई-वडिलांचा आधार असतो तो,
त्यांच्या आनंदासाठी स्वतःला हरवणारा,
आणि त्यांच्या हाकेसाठी धावत जाणारा – तो एक पुरुष मुलगा असतो.

बायकोच्या बांगड्यांत रंग बहरतो,
त्याच्या हातांतील घड्याळ मात्र जुनंच ठेवतो,
तिच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी स्वतःला झिजवत,
तिच्या स्वप्नांना पूर्ण करणारा – तो एक पुरुष नवरा असतो.

कधी मित्रांना सांगावं वाटतं त्याला, की "मी दमलोय रे!",
पण मित्रांसाठी हक्काचा खांदा असतो तो,
स्वतःचं दुःख लपवून त्यांना हसवणारा,
"कसली चिंता नको रे!" म्हणत सावरून घेणारा,
आणि स्वतःचं मन गुपचूप सांभाळणारा – तो एक पुरुष मित्र असतो.

घराच्या भिंती उभ्या ठेवणारा,
शाळेच्या फीपासून घराच्या हफ्त्यांपर्यंत झिजणारा,
भावनांना शब्द देण्याऐवजी,
हिशेब आणि जबाबदाऱ्यांतच गुरफटून जाणारा,
आणि तरीही "तू कमीच करतोस," असं ऐकणारा – तो एक पुरुष घरचा कर्ता असतो.

थकतो तोही, पण उघडपणे सांगू शकत नाही,
रडावंसं वाटलं तरी डोळे मिटू शकत नाही,
कारण त्याला थकण्याचीही परवानगी नसते.
"पुरुषाने मजबूत असायलाच हवं," हा नियम तो तोडू शकत नाही,
आणि तरीही घरासाठी पुन्हा उभा राहतो – तो एक पुरुष स्वतः असतो.

दुःख पचवूनही हसतो सदा,
म्हणूनच, पुरुषाचा संसार हा असा,
स्वतःसाठी नाही, पण सर्वांसाठी जगणारा असतो...
कोणीतरी त्याला विचारावं, "तू कसा आहेस?"
कारण घर चालवणाऱ्या त्या खांद्यालाही
कधीतरी आधार हवा असतो...