मित्रांसोबतची संध्याकाळ...
मनात कितीतरी प्रश्नांचं काहूर उठतं,
"हे सगळं मीच सहन का करावं?"
पण उत्तर शोधताही येत नाही,
कारण प्रत्येक वेदना शब्दात सांगता येत नाही...
घरात न सांगता येणाऱ्या गोष्टी,
मनाच्या खोल तळात दडत जातात.
विचार करतो,
आईला सांगू? तर – ती काळजीत पडेल,
वडिलांशी बोलू? तर– ते जबाबदाऱ्या आठवून समजवतील.
मग
आई-बाबांसमोर शब्द सहज गवसत नाहीत
आणि जिवलग असूनह जोडीदारालाही,
मनातली व्यथा सांगता येत नाही.
पण संध्याकाळ झाली की,
मित्रांची हाक येते,
"चल भेटू कट्ट्यावर,"
आणि आयुष्याचं ओझं हलकं होतं.
कट्ट्यावर पोहोचताच,
चहा हातात येतो,
कोणी टोमणे मारतं, कोणी जुन्या आठवणी काढतं,
हसता हसता, नकळत मनातले
बोचरे प्रश्न निघून जातात,
आणि कधीच न सांगितलेल्या
गोष्टीही सहज बोलल्या जातात.
कटिंग चहा आणि समोशाच्या घडीत,
किती तरी समस्या विरघळून जातात,
कुणाच्या डोळ्यातलं पाणी हसू होतं,
तर कुणाच्या जखमा हळूहळू भरतात.
कोणी म्हणतं, "वेड्या, एवढं टेन्शन घेऊ नको,"
तर कोणी खांद्यावर हात ठेवतं,
"आपण सोबत आहोत" एवढं ऐकताच,
मनातलं मळभ दूर होतं.
हसताना, टोमणे मारताना,
नकळत डोळ्यात पाणी साचतं,
पण मित्रांसमोर ते लपवण्याची गरज नसते.
घरात कधीच न मिळणारी मोकळीक,
मित्रांबरोबरच्या संध्याकाळीत सहज मिळते.
घर, जबाबदाऱ्या, प्रेम, तणाव, अपेक्षा,
या साऱ्यांच्या ओझ्याखाली दबतो आपण,
आयुष्याच्या हरवलेल्या प्रश्नांचं,
उत्तर मात्र कधीच सापडत नसतं,
पण संध्याकाळ मित्रांसोबत गेली की,
त्या प्रत्येक समस्येचं समाधान होत.
रात्री परतताना,
तेच प्रश्न पुन्हा समोर उभे राहतात,
पण फरक एवढाच असतो,
आता त्यांना तोंड द्यायचं धैर्य आलं असतं...