कदाचित...

प्रेम नावाचं शहर आहे, जिथे मौन गातं, आठवणी कोरल्या जातात, शब्द हरवतात, आणि प्रत्येक कहाणी अर्धवट आणि लेखकाचा—शोध अपूर्णच असतो.


पून्ह्यांदा आलो या शहरात,
जिथे शब्द बोलले जात नाहीत,
फक्त डोळ्यांच्या भाषेत संवाद होतात,
आणि मौनचंही एक निराळं गाणं असतं.

प्रेम इथे शब्दांत होतं,
कधी चिठ्ठीत, कधी कवितेत होतं.
कोणी मनगटावर नाव कोरत होतं,
तर कोणी हळूच निरोप देत होतं.

एक प्रेमी कट्ट्यावर बसलेले,
आणि दुसरे कुठल्याशा आठवणीत हरवलेले.
कुठे तरी एकटेपणात खिडकीतून डोळे वाट पाहत होते,
तर कुठेतरी पावसात दोन छत्र्या एकत्र नाचत होत्या.

एक कट्ट्यावर कोरलेल्या नावांना धूळ लागली होती,
तर दुसऱ्या एका वळणावर नवी नावं उमटत होती.
एकाकडं गुलाब होता पण त्याचं हसू हरवलं होतं,
तर दुसऱ्याकडं शब्द होते पण आवाज हरवलं होतं.
कोणी पहिलं प्रेम जपून ठेवलेलं,
तर कोणीतरी त्याच प्रेमाला परकं ठरवलेलं.

या शहरात ‘संपलं’ असं काहीच नव्हतं,
इथं सगळं फक्त ‘अर्धवट’ होतं.
चिठ्ठ्या लिहिल्या जात होत्या, पण पाठवल्या जात नव्हत्या,
संवाद झाले होते, पण शब्द बोलले नव्हते.

मी अजूनही अनोळखी इथल्या प्रेमकहाण्यांना,
शोधत होतो, समजत होतो.
गर्दीत ओळखीचा आवाज शोधत होतो,
कुणीतरी पुन्हा हाक मारेल, असं वाटत होतं.
कदाचित मीही इथं कुठेतरी ठेच लागून थांबेन,
आणि प्रेमाच्या एका नव्या कहाणीत हरवून जाईन.

पण,
मी फक्त प्रवासी, अजूनही शोधत आहे,
या शहरात माझी कहाणी सापडेल का?
कारण, माझ्या हातात अजूनही रिकामा कागद तसाच होता,
शब्द भरायचे होते त्यात,
पण प्रेमाची खरी परिभाषाच उमजली नाही..."

"कदाचित हा प्रेमाचा आठवडा खऱ्या प्रेमाचं प्रतिक नाही!"

-अनविचारी शब्द (Words by Nisarg)