तिची वेणी सुटली...
हळुवारपणे ती पाठीवर उधळली,
माझ्या नजरेला तिच्या गंधाचा भास झाला,
आणि ओठांवरचा माझ्या ताबा सुटला.
काही दिवसांच्या ओळखीत,
तिच्या हसण्यात माझा कधी जीव गुंतला,
हे मलाच कळले नाही,
तिच्या सावलीच्या हलक्याशा स्पर्शाने,
माझ्या मनात धुंद नशा भरली.
वेणी सुटली,
तसा तीचाही ताबा सुटला,
तिचे डोळे माझ्या डोळ्यांत उतरले,
आणि वेळ कुठे थांबून गेला,
हे कोणाला कळलेच नाही.
ती निःशब्द उभी होती,
आणि मी शब्दांच्या पलीकडे हरवून,
तिच्या केसांच्या दरवळत्या गंधात,
स्वतःला विसरून बसलो होतो.
तिचा तो एक वेडा चंचल हसरा चेहरा,
माझ्या ओठांवरची धाकधूक शांत करत होता,
आणि तिच्या भुवईखालच्या सावल्यांत,
माझं अस्तित्व निवांत होत होतं.
वेणी सुटल्यावर ती हलकीशी लाजली,
आणि तिच्या गालावरचं ते लाजरं हसू,
माझ्या मनाच्या कोपऱ्यात वसंत फुलवत गेलं,
जणू जगातलं सर्व सौंदर्य तिथेच थांबलं होतं.
सुटलेल्या वेणीसारखेच,
आमचे बोलके क्षण विखुरले,
तरीही त्या क्षणांत,
एक गोडसर गंध दरवळला,
आणि आम्ही दोघेही त्या मोहात कैद झालो.
ती केस गोळा करत होती,
आणि मी त्या क्षणांमध्ये गुंतून,
तिच्या वळणदार हालचालींना कवटाळत,
तिच्या सुंदरतेला जागत होतो.
वेणी बांधायची घाई होती तिला,
पण माझ्या मनात ती अजूनही सुटलेली,
मोकळीच भासत होती,
आणि त्या मोकळेपणात मी पूर्ण हरवलो होतो...