जगता जगता आतून मेलेला तो...

ही कविता लेखकाच्या अंतर्मनातील वेदना, नकली हास्याआड दडलेलं दुःख, आणि जगासाठी जिवंत असूनही आतून मेलेल्या व्यक्तीचं चित्रण करते.


हसरा चेहरा, पण डोळ्यांत काळोख,
मनात दाटलेली कुठलीशी वेदनांची ओघ.
सारं काही ठीक असल्यासारखं दाखवत,
आतून कुढत जगणारा तो.

जगता जगता आतून मेलेला तो,
हसऱ्या चेहऱ्याआड दडलेला तो.
साऱ्या जगाला आनंदी भासतो,
पण स्वतःत कुठेतरी हरवलेला तो.

हसताना डोळ्यांत ओल दिसते,
मनाच्या तळाशी वेदना खदखदते.
जगाच्या गजबजाटात हरवून गेला,
आपल्याच साऱ्या आठवणीत जळलेला तो.

जगता जगता आतून मेलेला तो,
स्वतःच्या भावनांना मनातच ठेवणारा तो.
कोणीही विचारलं, "कसा आहेस रे?"
तेव्हा हसून उत्तर देणारा तो.

रस्त्यावरच्या गर्दीत एकटा चालणारा,
आपल्याच विचारांत हरवलेला.
आपल्याच आयुष्याचा प्रवासी,
पण जगात परका झालेला तो.

जगता जगता आतून मेलेला तो,
रोजच्या जगण्यात सावरायचं ठरवतो,
पण आठवणींच्या वादळात वाहून जातो.
ओठांवर हसू, पण मनात एक वाद,
स्वतःशीच रोज लढणारा तो.

श्वास चालू असला त्याचा तरी,
आत कुठेतरी संपलेला,
जगता जगता आतून कधीच मेलेला,
पण तरीही इतरांसाठी जिवंत असलेला तो

जगता जगता आतून मेलेला तो,
रोज नवीन सकाळ त्याच्या आयुष्यात उगवते,
तसा रोज सकाळी आरशात पाहतो तो,
पण स्वप्नं त्याची जुन्या रात्रीतच मरतात,
अन् चेहऱ्यावर त्याच्या ओळख उरत नाही.

कोणी समजून घ्यावं असं वाटतं त्याला,
पण भावना त्याच्या ओठांवरच थांबतात.
रोजच्या जगण्याचा नकली खेळ खेळत,
रडावसं वाटतं, त्याला पण अश्रूना त्याच्या परवानगी नाही.

मन मोकळं करावं म्हणतो,
पण शब्दांना त्याच्या जागा नाही.
जगासाठी जिवंत, पण स्वतःसाठी आतून मेलाय फार आधी,
तरीही इतरांसाठी जिवंत असलेला,
असाच जगतोय, हरवत, सावरणारा तो.

जर कोणी विचारलं, "कोण आहे तो?"
तर कदाचित तुझ्याही डोळ्यांत त्याची सावली दिसेल...