कळलेच नाही...

ही कविता प्रेमातील अनिश्चितता, अबोल भावना, आणि आठवणींच्या सावल्या यांचे भावनिक दर्शन घडवते, जिथे सत्य आणि भास यामध्ये गोंधळ उडतो.


भिडले डोळे, श्वास थांबले,
प्रेम कधी जडले ह्रदयात
कळलेच नाही...

अबोल मी तिच्यासमोर,
तरी पुटपुटत गेलो,
तिने मांडले मत तिचे,
अन्, मी माझे मत मांडले.
अन् क्षणात वेळ सरला, कसा?
कळलेच नाही...

सहज ती बोलून गेली,
"जर वेळ थांबवता आला असता तर?"
त्या शब्दांमधले होते अर्थ गहिरे
ती समोर असताना तिच्याविना काही
कळलेच नाही...

मनात होते भाव सारे,
पण ओठांवर नव्हते माझ्या,
तिच्या नजरेत कधी हरवून गेलो,
कळलेच नाही...

तिच्या स्पर्शाने विरल्या
साऱ्याच व्यथा माझ्या,
पण स्पर्श होता की भास तिचा तो,
अजूनही मला
कळलेच नाही...

आता आठवांची सावली
फक्त सोबत आहे,
पण ती सोबत नाही.
तिच्या मनात मी होतो का खरचं?
आजवर देखील कळलेच नाही...

रस्ते वेगळे झाले,
तरी सावल्या जुळल्या,
नातं होतं तरी काय?
प्रेम की फक्त भास,
अजूनही मला
कळलेच नाही...