अबोल झालेलं प्रेम...
लहानपणी आईच्या पदराला लपणारा,
आज मोठ्या जबाबदाऱ्या कशा
सांभाळून घ्यायला लागलास रे?
आता लहानपणीसारखा का भांडत नाहीस?
कोण म्हणेल, हा तोच खेळकर,
हट्टी, चिडका पोरगा,
जो बाबांकडे हट्टाने लाडीगोडी लावायचा,
आणि आज आमच्या लेकरांचा हट्ट पुरवत आहेस!
बाबा गेल्यावर घराचा आधार बनलास,
आईच्या डोळ्यांतील अश्रू
शब्दांशिवाय समजायला लागलास.
खट्याळ पोरगा होतास,
कळलंच नाही, कधी एवढा शांत झालास!
बाहेर कुणी काही बोललं,
तर माझ्यासाठी भांडायला पहिला उभा राहायचास.
आजही कुणी काही बोललं,
तर तू अजून तसाच उभा राहशील ना रे?
कधी कुठे गेले तरी,
"मला सोडायचं नाही!" असं म्हणणारा,
आज मात्र सासरी पुन्हा पाठवताना,
डोळ्यांतलं पाणी लपवून हसत का उभा राहतोस?
मी रडले की चिडवायचास,
पण तशीच राहिली तर,
माझ्या आवडीच्या चॉकलेट्सही आणायचास.
घरभर धिंगाणा घालणारा, मला चिडवणारा,
आज स्वतःच शांत का झालास रे?
लग्नानंतर घरी आले तेव्हा,
पाहुण्यासारखा पाहुणचार राखतोस,
भांडणाच्या जागी आता जपणूक देतोस.
कधी घरी आलेच तर,
आता कसली भांडणं नाहीत, ना हट्ट कोणते,
फक्त तुझं माझ्यावरचं अबोल प्रेम दिसत असतं.
ते लपवायला शिकलास, पण मी ओळखते रे!
घरचं अंगण तसंच आहे,
पण त्यातला गोंधळ कुठेतरी हरवलाय...
सासरही छान आहे, प्रेमही भरपूर मिळतंय,
पण सासर कितीही चांगलं असलं,
तरी ते माहेर होत नाही रे.
तुझ्या खोड्या, तुझं चिडवणं,
तेच तर घरातलं खरं सौख्य होतं...
ते आता हरवल्यासारखं वाटतंय,
आणि तुझ्यासोबतच्या त्या गोड
भांडणांची आज उणीव भासते.
आजही तू तितकाच माझ्यासाठी झुरतोस,
पण रोजच्या भांडणांचं प्रेम कुठे लपवलंस?
पूर्वी ज्या खोड्या काढायचास,
त्या आता आठवणीत का दडवल्यास?
तू लपून माझ्यासाठी रडतोस,
ते तुझ्या डोळ्यांतही मी ओळखलंय.
आज तुझ्या चेहऱ्यावरची उदासी लपवायला,
माझ्याकडे काहीच नाही रे...
आज राखीच्या दिवशी काही नको रे मला,
फक्त एवढंच सांग—
तू पहिल्यासारखा पुन्हा होशील का रे?