पूर्णविराम...
जोवर शेवटचा बिंदू लागत नाही.
अर्थ शोधत राहतो मन,
जोवर पूर्णविराम लागत नाही.
तो असतो… कुठेतरी अस्तित्वात,
चालता-बोलता, हसता-खेळता,
पण कुणीच त्याला विशेष मानत नाही,
कुणालाच त्याचं महत्त्व कळत नाही.
तो जाताच शब्दांचे ढग दाटतात,
आठवणींनी वाहवा सुरू होते,
"खूप चांगला होता," "सार्वजनिक माणूस तो,"
"साऱ्यांना मदत करायचा" – अशी नेक विशेषणं लागतात.
तो असताना कोणीच म्हणत नाही,
"किती सुंदर आहे त्याचं अस्तित्व,"
पण तो गेला की सगळ्यांच्या ओठी,
त्याच्या नावाचा उल्लेख असतो!
आयुष्यभर अपूर्ण राहत त्याचं अस्तित्व,
त्याला अचानक एक पूर्णविराम मिळतो,
मग कुणालातरी जाणवतं,
की त्याचं आयुष्य खरंच अर्थपूर्ण होतं.
तोवर तो असतो, एक अर्धवट ओळ,
तो जातो, तशी ती ओळ पूर्ण होते.
त्याच्या नसण्यानेच मिळतो त्याला अर्थ,
कारण शेवटी… पूर्णविरामच वाक्य पूर्ण करतो!