आयुष्याचा बाजार मांडून बसलेला तो...
आयुष्याचा बाजार मांडून बसलाय,
शेतीवरच जगणारा
आज जीव गमावून बसलाय.
कधी पाण्याच्या थेंबासाठी
त्याचे डोळे आसवांनी भरतात,
तर कधी कर्जाच्या बोझाखाली
तो वाड्याची शेवटची माती विकतो.
चार एकरात सोनं पिकवलं तरी
बाजारात गहाण टाकून यावं लागतं,
तुमच्या माझ्या ताटात येणाऱ्या घासासाठी
त्याला त्याच्या मुलीचं मंगळसूत्र मोडावं लागतं.
बँकांची नोटीस आली की
त्याच्या घरातला दिवा विझतो,
उधारीतल्या त्याच्या जीवनाला
आत्महत्या हाच शेवटचा पर्याय दिसतो.
सरकारी जाहीरनाम्यांत
तो नेहमी समृद्ध असतो,
पण जमिनीचा तुकडा विकल्याशिवाय
त्याच्या घरची चूलही पेटत नसते.
बँका म्हणतात ‘कर्ज फेडा,’ सरकार ‘थांबा’ म्हणतं,
कर्जमाफीच्या नावाने होणारा हा खेळ मात्र संपतच नाही.
अन् हजारो अर्ज धूळ खात पडतात,
तेव्हा मदतीच्या आशेने त्याचे डोळे देखील थकून जातात.
कोणी मदत जाहीर करत,
कोणी फोटो काढून निघून जातं,
कर्जमाफीच्या घोषणा निवडणुकांपर्यंत पोहोचतात,
पण त्याच्या खऱ्या प्रश्नांवर नेते बहिरे होतात.
कधी त्याच्या कपाळावर बंदुकीच्या गोळ्या फुटतात,
तर कोणी विष प्यायचं ठरवतो.
घरातील माय साडीच्या टोकाने असावं पुसते,
आणि तिथेच कुठेतरी एक शेतकरी फासावर झुलतो.
आठवडे बाजारात तो अजूनही वाट पाहतोय,
कोणी तरी येईल,
त्याच्या आयुष्याला किंमत देईल,
नाहीतर त्याच्या घरच्यांना जमिनीत पुरायला एक खड्डा तरी देईल..."