गोकुळ...
तरी घर आता घरसारखं वाटत नाही,
रात्र झाली, चंद्र झोपला,
आणि मलाही स्वतःला सावरता आलं नाही.
मी उशीत डोकं खुपसून बसलो
उगाचच ओठांवर आठवण आली,
आईच्या कुशीची हूरहूर हळूच
खोल मनात दाटू लागली.
उशीत जरी डोकं ठेवलं,
तरी हात फिरवायला कुणीच नव्हतं,
हात फिरवला उशीवरती,
तरी तिच्या हातासारखं काही भासलनाही.
शब्दांवर पांघरूण टाकलं तरी,
तिच्या अंगाई सारखं काहीच नव्हतं,
स्वप्नात जरी आई भेटली,
तरी सकाळी ती आता दिसत नाही.
भूक लागली म्हणून स्वयंपाक केला,
पण चव मात्र वेगळीच लागली,
तिच्या हातात जी जादू होती,
ती आता कुठेच राहिली नाही.
ऊन असो, वा पाऊस असो,
तिच्या पदराखालीच गारवा होता,
आता गादी मऊ असली तरी,
तिच्या कुशीसारखी भासत नाही.
लहान होऊन रडावं वाटतं,
आईच्या कुशीत शिरावं वाटतं,
रात्रभर तिच्या उबेत झोपावं,
आणि पुन्हा सकाळी पोरकं व्हावं वाटतं.
डोक्यावर हात ठेवून विचारायची ती रोज,
"काय रे बाळा, आज कसा गेला दिवस?"
आता दिवस कसेही जाऊ देत,
विचारणारं जवळच कुणी उरलंच नाही.
बाहेरच्या गर्दीत हरवलो जरी,
तरी उशीत डोकं घालून शोधतो,
आईच्या कुशीची ऊब कुठे मिळेल,
हे रोजच नशिबाला विचारत बसतो.
आईची कुशी म्हणजे गोकुळ असतं,
पण ती सोबत असताना हे सारं कळलं नाही,
आठवणींच्या ओलाव्यात आजही ती सोबत आहे,
पण पुन्हा तिला हाक मारता येत नाही.
पुन्हा तिला हाक मारता येत नाही..."