भूक...

ही कविता भूकेच्या विविध रूपांवर प्रकाश टाकते—अन्न, ज्ञान, स्वप्नं—आणि माणुसकीच्या भुकेची गरज अधोरेखित करते. माणुसकीची भूक असेल, तर कोणीही उपाशी राहणार नाही, मेहनतीला किंमत मिळेल, प्रेम टिकेल आणि प्रत्येकाला सन्मान मिळेल.


"भूक केवळ ताटात नसते,
ती डोळ्यात, ती ओठात असते.

कोणी भुकेला असतो अन्नासाठी,
कोणी ज्ञानासाठी झुरत असतो.
कुणाला प्रेमाची तहान असते,
तर कुणाला स्वप्नं गाठायची इच्छा असते.

पोट भरलं तरी मन रिकामं,
अशी या मनाचीही एक भूक असते.
ही भूक वेगळीच असते,
कधी कधी जन्मभराची सवय बनते.

अन्नाने शांती मिळते फक्त पोटाला,
मनाची भूक कुठे मिटते एका घासाला?

कोणाचं अन्न ताटभर पडलेलं,
कोणीतरी तुकड्यासाठी तडफडलेलं.
तर, कोणाचं आयुष्य पोट भरण्यात जातं.

भूक केवळ अन्नाची नसते,
तिच्यामुळे अनेक घरं राख होतात.
हक्काची भूक, प्रेमाची भूक,
सन्मानाची भूक, स्वप्नांची भूक...

कोणी जगतं दोन वेळच्या भाकरीसाठी,
कोणी झगडतं नाव कमवण्यासाठी.
एक लढतो जिवंत राहण्यासाठी,
तर दुसरा भुकेपायी रक्त सांडत असतो.

कोणाच्याच भुकेला शेवट नसतो,
कोणाची भूक जन्मभर वंचितच असते.
तर कोणाची भूक कधी तळहातावर दिसते.

पण मी म्हणतो,
या सगळ्यात एक भूक असली पाहिजे—
ती माणुसकीची...

माणुसकीची भूक असेल, तर कुणी उपाशी झोपणार नाही,
ना कुणाला ताटभर अन्न असूनही कमी भासणार नाही.

माणुसकीची भूक असेल, तर भुकेलेल्याला ताट मिळेल,
श्रमिकाच्या घामाला किंमत मिळेल.

ही भूक असेल, तर घरटं फक्त भिंतींचं राहणार नाही,
तर त्यात माणसांचा उबदारपणाही राहील.

माणुसकीची भूक जर प्रत्येक मनात जागी राहिली,
तर कोणी अन्नासाठी झुरणार नाही,
कोणी प्रेमासाठी तडफडणार नाही,
कोणी सन्मानासाठी लाचार होणार नाही.

कारण खरी भूक, ही पोटाची नव्हे...
तर एका माणसाला दुसऱ्यासाठी वाटणाऱ्या आपलेपणाची हवी..."