धूर...
तू धूर काढतोस, तुला मजा वाटते,
म्हणतोस, टेन्शन नाहीसं होतं.
हळूहळू फुफ्फुस जळतं, तुझं...
श्वास अडकतो...
पण तरीही तुला
हेच जगणं भारी वाटतं!
पहिली मजा होती,
दुसऱ्यांदा सवय झाली.
तिसऱ्या-चौथ्यांनंतर,
हळूहळू गरज बनली.
पण आता...?
तू तिच्याशिवाय राहू शकत नाहीस,
आणि ती तुला संपवतेय... हळूहळू.
धूर उडवतोस, मजेत...
म्हणतोस, "माझं शरीर, माझा हक्क!"
पण तोच धूर
इतरांच्या श्वासात मिसळतो,
त्यांचंही आयुष्य घट्ट करतो...
कधी याचा विचार केलास का?
तू धूर सोडतोस,
स्वतःलाच हळूहळू राख करतोस.
अन् तोच धूर
त्या रस्त्यावरच्या निष्पाप जीवांच्या श्वासात मिसळतो,
त्यांच्या शरीरात अनोळखी आजार पेरतो...
अनाहूतपणे.
गर्दीत उभा,
धूर हवेत सोडतोस.
अन् मग तुझी सवय फक्त
तुझीच राहत नाही,
इतरांच्या श्वासातही विरघळते,
आणि कोण जाणे, किती जीव हळूहळू हरवत जातात...
एक आई गरोदर...
ती फक्त श्वास घेत असते,
पण हवेत तुझ्या सवयीचा धूर आहे...
तिच्या ओटीतल्या स्पंदनांना
तोच विषारी स्पर्श मिळतो...
तिला कुठलीही सवय नाही,
तरीही बाळाच्या रक्तात विष भिनत जातं,
त्याच्या नशिबात आजार कोरले जातात,
आणि त्याचा जगण्याचा हक्कही हिरावला जातो...
ते जन्मलं असतं,
पहिल्यांदा डोळे उघडले असते,
आईच्या कुशीत शांत झोपलं असतं,
पण तुझ्या एका सवयीने
त्याचा पहिला श्वासच हिरावून घेतला...
एक बाबा घरी बसलेला असतो...
हळूहळू निवृत्तीचे दिवस मोजत,
तुझ्या सवयीचा धूर
त्याच्या श्वासात विरघळत जातो,
आणि तोच नकळत
त्याच्या मरणाच्या दिशेने चालू लागतो...
तू म्हणतोस, "माझं फुफ्फुस आहे, माझा प्रश्न!"
पण त्याच्या छातीत उठणारी धडधड
तुला का ऐकू येत नाही?
तुझ्या एका कशाने
त्याच्या आयुष्याचीही काही वर्षं कमी होतात,
आणि तुला तो फक्त धूर वाटतो...?
बस स्टँडवर उभं नवजात लेकरू...
त्या वृद्धांच्या थकलेल्या फुफ्फुसांत,
तुझ्या सवयीची सजा आहे...
आणि
कामगाराच्या दुपारच्या जेवणात,
तुझ्या कशाची कडू धूळ आहे...
तुझा तो एक कश
म्हणजे फक्त धूर नाही,
नेक आयुष्यांवर उमटणारी
मरणाची सावली आहे...
तू एकटा नाही जळत...
धूर तुझ्या ओठांतून निघतो,
पण फुफ्फुसं दुसऱ्यांचीही करपतात...
सिगारेट तुझ्या बोटांत असते,
पण तिची शिक्षा चौफेर पसरते.
अन् तुझ्या एका आनंदासाठी,
अनेक श्वास दबून जातात...
तू एकटा नाही जळत,
तुझ्या सोबत इतरही बळी पडतात.
तुझ्या एका कशाने
त्यांच्याही आयुष्याचे तुकडे होतात...
हक्क हवा ना तुला? मग जबाबदारीही घे!
तुझी सवय तुझीच असू दे,
पण तिची शिक्षा इतरांनी का भोगावी?
सिगारेट जळो, तुझ्या इच्छेने,
पण दुसऱ्यांच्या श्वासांना राख होऊ देऊ नकोस..."