दहावा...

ही कविता एक आत्मा बोलत आहे असे दर्शवते, जो मृत्यूनंतर आपली आठवण, कुटुंबाच्या शोकात गहिरा असतो. आणि गाऱ्हाणं मांडत आहे.


"पहिल्या दिवशी...
घरात शांतता नव्हती,
फक्त रडारड आणि ओल्या नजरा.
माझा फोटो हारात अडकला होता,
आणि तरी वाटत होतं –
मी अजून इथेच आहे...

दुसऱ्या दिवशी,
किचनमध्ये माझ्या आवडीचा चहा बनला.
आई म्हणाली, "तो असता तर..."
वाक्य अपूर्ण होतं,
जसं माझं आयुष्य...

घरात पहिल्यांदाच "शांत" जेवण झालं,
माझ्या जागेवर कोणी बसलंही नाही
आणि माझं ताटही मांडलं गेलं नाही.

तिसऱ्या दिवशी,
माझ्या खोलीत वाऱ्याने खिडकी हललेली
कुणालातरी वाटलं मीच आलोय,
पण ते आता शक्य नव्हतं.

चौथा दिवस...
मोबाईलचा लॉक उघडण्याचा प्रयत्न झाला,
कोड आठवला नाही कुणालाच.
आणि माझ्या शेवटच्या कॉललिस्टमध्ये
ती होती,
जिला शेवटचं बोलायचं राहून गेलेलं...

त्या मैत्रिणीने मला आठवतं
माझी कविता वाचली,
ती थोडं हसली, थोडं रडली.
तीच शेवटची होती
जी अजून माझ्याशी बोलत होती.

पाचव्या दिवशी,
मी शेजारच्या काकांच्या स्वप्नात आलो म्हणे,
पण जाग आल्यावर त्यांनीही विसरून टाकलं,
किती लवकर माणसं
स्वप्नातही परकी होतात ना?

त्यांना सगळं थोडं 'सामान्य' वाटू लागलं
जे अधिक त्रासदायक होतं.
माझं नसनही
आता सवयीचं होऊ लागलं.

सहाव्या दिवशी...
माझ्या कपड्यांची घडी झाली,
काही कपडे गरीबांना देण्यासाठी निवडले गेले.
एक जुना टीशर्ट आईने बाजूला ठेवला —
"याच्या सुगंधासारखं काही नाही म्हणत..."

ते कपडे घेण्यासाठी आलेला
एक मित्र अजूनही बोलतोय माझ्याशी,
मनात —
त्याच्या मनात मी अजूनही जिवंत आहे,
गेले पाच कधी तो रडतो, कधी हसतो,
पण त्याने माझ्यासोबत संवाद थांबवलेला नाही...
आणि या नात्याला मृत्यूही मरू शकत नाही.

सातव्या दिवशी
दिवा विझला...
कोणी विचारलं – "सहा दिवस का नाही?
आणि मग...
तेच लोक म्हणाले –
"आता त्याचं आत्मं निघालं असेल..."
आणि
मी... आता फक्त आठवणीत उरणार होतो
हे मला समजत होतं.

आठव्या दिवशी,
मी दरवाज्यात उभा होतो,
ते मला पाहू शकले नाहीत,
आणि मलाही जाणवलं —
ते घर आता माझं उरलेलं नाही..

नवव्या दिवशी...
बाबा शांत होते, पण त्यांच्या हातातला तो गढलेला फोटो
खूप काही बोलत होता.
त्यांच्या डोळ्यातला अडकलेला अश्रू
दहाव्यासाठी उगम शोधत होता.

दहावा आला...
सगळे जमले.
पांढऱ्या कपड्यांत,
अश्रू कमी,
सैरावैरा बोलणं अधिक.
जेवणाची व्यवस्था झाली,
खास माझ्या नावाने "दहावा" होता...

कोणी म्हणालं –
"अरे शांत माणूस होता."
कोणी – "अजून जगू शकला असता."
आणि मी?
मी त्या कोपऱ्यात शांत बसून होतो,
सगळं ऐकत, सगळं बघत.

दहाव्याच्या जेवणात
माझ्या आवडीच्या गोडातही
कोणी लक्ष दिलं नाही.
ताटं रिकामी झाली,
आणि जो तो आपल्या
कामात रमून गेला.

मृत्यू नंतर कळतं –
लोकं विसरतात चेहऱा, पण ठेवतात फोटो,
आठवतात काही क्षण, पण जगतात पुढे,
आणि 'दहावा' होतो शेवटचा दिवस
"आपण होतो" या विचाराचा..."