प्रेम ते कधी परत मिळतं का?

ही कविता एकतर्फी प्रेमाच्या भावविश्वात मनात दडलेल्या प्रश्नांची — उत्तरांच्या प्रतीक्षेत साचलेली प्रत्येक वेदना व्यक्त करते.


"कधी तरी स्वतःचा वेळ
देऊन तो उसना मागितला आहे का?
मनाच्या कोपऱ्यात
शब्द न बोलता, तिची वाट पाहिली आहेस का?

ती typing वर आली, म्हणून
तुझ्या ह्रदयाची गती बदलली आहे का?
"आज थोडं उशीर होईल" एवढंच लिहून
ती हलकी झाली...
आणि तू मात्र रात्रभर
notification ची वाट बघत थांबला आहेस का?

स्वतः झिजून, दतिच्या
शांततेचा भाग झालास का?
तिला समजून घेताना
स्वतःला विसरून गेला आहेस का?

"आपणच कमी पडलो का?" या प्रश्नाशी
आरसा बनून बोलला आहेस का?
तिचं "नंतर बोलू" हे वाक्य ठरूनही,
तासन् तास मोबाईलकडे पाहिलं आहेस का?

तिला "सांभाळून घे" म्हणताना
कोणी तुला विचारलं का –
"तू कसा आहेस?" – असं कोणी तरी विचारावंसं वाटतं का?

"इतका विचार का करतोस माझा?"
या वाक्यावर स्वतःचेच विचार अपराधी ठरवले आहेत का?

एकाच मेसेजवर
'मग ती वाचेल... उत्तर देईल'
म्हणत दिवस सरवला आहेस का?
तिच्या 'Reply नाही आलाय अजून' या विचारानं,
स्वतःला चुकीचा ठरवलं आहेस का?

तिचं 'मोठं स्वप्नं' मान्य करताना
तुझी स्वप्नं बाजूला ठेवली आहेत का?
तिला 'सुटं देणं' हा मोठेपणा समजून घेताना,
स्वतःचं तुटणं कुणाला सांगितलं आहेस का?

तिच्या लक्ष न देण्यावरही
"ती थकली असेल" असं म्हणत
स्वतःला समजावलं आहेस का?
तिच्या 'डोळ्यांत' काय आहे
हे वाचायचा प्रयत्न करताना
स्वतःच्या डोळ्यांत पाणी साठलेलं जाणवलं आहेस का?

तिच्यासाठी "सगळं सोडून"
स्वतःचं आयुष्य थांबवलं आहेस का?
तिच्या आठवणींना
स्वतःच्या सवयी बनवलं आहेस का?

ती दिसत नसतानाही,
तिच्यासोबत संवाद चालू ठेवला आहे का?
तिच्या "मी आहेच ना!" या जुन्या वाक्यावर
आजही मन विसावायला जातं का?

एखाद्या गाण्यात ती अजूनही तुझी वाटते का…
आणि त्याच गाण्यानं
रात्रभर डोळे ओले केले आहेत का?

आता समजत असेल...
प्रेम म्हणजे केवळ जवळ असणं नव्हे,
तर अंतरावरही आपला वेळ, मन आणि हसणं उसनं द्यावं लागतं...

पण सगळ्यात मोठा प्रश्न –
ते कधी परत मिळतं का...?"